माझ्या मनाचा शोध

Friday, July 18, 2008

तिसरं वर्ष .... बहुतेक आता माझ्या नोंदनिशीचं वार्षिक उपक्रमात रुपांतर व्हायला लागलंय असा वाचकांचा समज झाला असणारे .... आता हे सिद्ध करायला आणिक एक वर्ष लागेल बहुतेक ... mathematical induction ने ..... अरेरे .... मी फारच कंटाळले आहे ... mathematical induction वगैरे म्हणजे फारच झालं, नाही का?? ...

तसं लिहाण्याजोगं फार काही नाहीये .... उगाच टपलीत मारावं म्हणून आले .... :D ....

Thursday, June 14, 2007

तब्बल एक वर्षापूर्वी मी ही नोंदनिशी लिहायला घेतली. सवयीप्रमाणे सुरुवातीचा उत्साह टिकला नाही आणि एक वर्ष उलटून गेलं. आता परत लिहिण्याची गरज भासली तेंव्हा परतून आले. माझ्या या खरडण्याला आता तरी थोडा नियमितपणा यावा अशी आशा आहे. हा नियमितपणा काही अंशी लिहिण्याच्या गरजेवरही अवलंबून असतो (दुष्टचक्र), तेंव्हा वेळोवेळी जे तुटपुंजे वाचक आहेत ते मला त्यांचं हे खरडणे वाचायच्या गरजेनुसार उकसवतील ही आशाही जाताजाता व्यक्त करते.

असो, तर माझ्यावर लिहिण्याचा प्रसंग यावाच का? कारण असे की माझ्या एका मित्राने एक लेख वाचावा अशी शिफ़ारस केली. आणि मीही आलिया भोगासी अश्या पवित्र्याने तो वाचायला घेतला ( येथे माझ्या मित्राने राग मानू नये, हे वैयक्तिक ताशेरे नसून, रात्रीचे ९ वाजले ही वस्तुस्थिती मला असं लिहायला प्रवृत्त करते आहे) . या लेखाचं शीर्षक होतं 'बाप'. बरं आता थोडं गंभीर व्हायला हवं. हा लेख मी वाचकांच्या संदर्भासाठी इथे छापत आहे.

" बाप

आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. पण घराच्या या अस्तित्वाला खरंच कधी आम्ही समजून घेतलेलं आहे का? वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही, लिहीलं जात नाही. कोणताही व्याख्याता आईविषयी जास्त वेळ बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचंच महत्व अधिक सांगितलेलं आहे. देवादिकांनी आईचेच तोंड भरून कौतूक केले आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते. पण बापाच्या विषयी कुठेच फारसं बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही तापट, व्यसनी, मारझोड करणारा. समाजात एक दोन टक्के बाप असे असतीलही. पण चांगल्या वडिलांबद्दल काय?आईकडे अश्रूंचे पाट असतात. पण बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यांवरच जास्त ताण पडतो. कारण ज्योतीपेक्षा समईच जास्त तापते ना! पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत राहतं! रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो.आई रडते. वडिलांना रडता येत नाही. स्वत:चा बाप वारला तरी रडता येत नाही. कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. आई गेली तरीही रडता येत नाही कारण बहीणींचा आधार व्हायचं असतं. पत्नी अर्ध्यावरच साथ सोदून गेली तर पोरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो.जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं, पण त्याचवेळेस शहाजी राजांची ओढाताण सुध्दा लक्षात घ्यावी. देवकीचं, यशोदेचं कौतूक अवश्य करावं पण पुरातुन पोराला डोक्यावर घेवून जाणारा वासुदेव लक्षात ठेवावा. राम हा कौसल्येचा पुत्र अवश्य असेल पण वियोगाने तडफडून मरण पावला तो पिता दरशथ होता. वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे पाहीलं की त्यांचं प्रेम कळतं. त्यांची फाटकी बनियन पाहीली की कळतं "आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियनला पडली आहेत" त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो.मुलीला गाऊन घेतील. मुलाला लुंगी घेतील पण स्वत: मात्र जुनी पॅंट वापरायला काढतील. मुलगा सलून मध्ये वीस-पंचवीस रूपये खर्च करतो. मुलगी ब्युटी पार्लरमध्ये तीसेक रूपये खर्च करते पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी खरडत असतो. अनेकदा तो नुसतं पाणी लावून दाढी करतॊ. बाप आजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही. तो आजाराला मुळीच घाबरत नाही. पण डॉक्टर एखादा महीना आराम करायला लावतील याची त्याला भिती वाटते. कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण बाकी असतं. घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं. ऐपत नसते तरीही मुलाला मेडिकलला, ईंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढताण सहन करून त्या मुलाला दरमहिन्याला पैसे पाठ्विले जातात. पण सर्वच नसली तरी काही मुलं अशीही असतात की जे तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रूममध्ये पार्ट्या देतात आणि ज्या बापांनी पैसे पाठविले त्याच बापाची टिंगल करतात. एकमेकांच्या बापाच्या नावानी एकमेकाला हाका मारतात.आई घराचं मांगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे त्या घराकडे वाईट नजरेनं कोणीही बघू शकत नाही. कारण घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काहीही करत नसला तरीही तो त्य पदावर असतो आणि घरच्यांचं कर्म बघत असतो. सांभाळत असतो. कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही. पण बाप होणं टाळता येतं. पण बाप कधीच बाप होण्याचं टाळत नाही. आईच्या असण्याला अथवा आई होण्याला बापामुळे अर्थ असतो.कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतूक करते. पण गुपचुप जावून पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात येत नाही. पहिलटकरणीचं खूप कौतूक होतं पण हॉस्पीटलच्या आवारात अस्वस्थपणे वावर्णाऱ्या त्या बाळाच्या बापाची कोणीही दखल घेत नाही.चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर आई गं हा शब्द बाहेर पडतो. पण हायवेला रस्ता क्रॉस करताना एखादा ट्र्क जवळ येवून ब्रेक अचानक लावतो तेव्हा "बाप रे" हाच शब्द बाहेर पडतो. कारण छोट्या संकटासाठी आई चालते पण मोठीमोठी वादळं पेलताना बापच आठवतो..... काय पटतय ना? delete कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्व मंडळी जातात. पण मयताच्या प्रसंगी बापालाच जावं लागतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो. पण गरीब मुलीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो. तरूण मुलगा उशीरा घरी येतो तेव्हा त्याची आई नाही तर बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलींच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप, घरच्यांसाठी स्वत:च्या व्यथा दडपणारा बाप..... खरंच किती ग्रेट असतो ना?वडिलांच महत्व कोणाला कळतं ? ..... लहानपणीच वडिल गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या खूप लवकर पेलाव्या लागतात. त्यांना एकेका वस्तूंसाठी तरसावं लागतं. वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेते ती म्हणजे त्या घरातील मुलगी. सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाशी फोनवर बोलतांना बापाचा बदललेला आवाज एका क्षणांत कळतो, मग ती अनेक प्रश्न विचारते. कोणतीही मुलगी स्वत:च्या इच्छा बाजूला ठेवून बाप म्हणेल तेंव्हा विवाहाच्या बोहल्यावर चढते. मुलगी बापाला जाणते, जपते इतरांनी सुध्दा असंच आपल्याला जाणांव हीच बापाची किमान अपेक्षा असते."


आई-वडिलांमध्ये चढाओढ असते हे मला माहित नव्हतं, खरंच असते का? ही नाती इतकी उथळ असतात का हो? त्यागाचे निकष, प्रेमाचे निकष कशासाठी लावायचे? प्रेम कसं व्यक्त करावे ते माणसाची प्रकृती ठरवते. इथे इच्छा नसूनही Ayn Rand मधील संदर्भ द्यावासा वाटतो. ती त्यागाची अतिशय सुंदर व्याख्या करते. त्याग केला हे सांगावं लागत असेल तर मग तो त्याग नसतो, तो समजून घ्यावा लागतो. तेंव्हा त्याग आणि प्रेम ह्या तर परस्परावलंबी भावना, एकमेकांना पूरक, एकीखेरीज दुसरी निरर्थक होते!

आई आणि बाबा ह्या भौतिकद्रुष्टया दोन व्यक्ती असतात, पण माझं अस्तित्वच त्यांचं अद्वैत सिद्ध करत नाही का? दोन रूपं दिसतात, आणि गोंधळ उडतो. एक मायाळू तर दुसरं परखड. एक कोडग्या समाजात जवळ घेऊन आधार देणारं तर दुसरं त्याच कोडग्या समाजाला सामोरं जाऊन तोंड देण्याची ताकद देणारं. नुकताच गायत्री नातुंच्या शब्दलुब्ध या नोंदनिशीवर एक पु.लं. आणि सुनीताबाईंवरचा एक लेख वाचला. हा लेख माझं मत अधिक परिणामकारकरित्या मांडतो.

http://shabdalubdha.blogspot.com/2006/03/blog-post.html

कोणी संसार सांभाळताना किती अधिक कष्ट घेतले याचा हिशोब ठेवण्यासारखं हे नातं नाही, तो ठेवावा लागत असेल, तर कुठेतरी काहीतरी चुकतंय हे समजावं! संसाराचं संतुलन बिघडलं की हे प्रश्न पडतात. आता संतुलन का बिघडतं याला सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक कारणं असू शकतात, त्यांत पडलं तर विषयांतर होईल असं वाटतं.

आईचं कौतुक वडिलांचं कर्तृत्व झाकोळतं असं वाटत असेल तर आपला द्रुष्टीकोण कोता आहे समजावं. स्त्रियांना परंपरेनुसार व्यावसायिक exposure नसायचं. वडिलांना कचेरीतल्या बढत्या असतात, professional challenges चं thrill असतं. स्त्रियांना कर्तृत्व कशात दाखवायचं हा choice नसतो ( किंवा नसायचा). घरात सगळे जेवल्यावर जेवणारी आई विसरता येते का? स्वत:च्या ताटातून काढून आपल्याला देणारी आई कशी विसरता येईल बरं? आणि हो, आज व्यावसायिक स्वातंत्र्य लाभलेलं असलं तरी आई ही आईच राहते. नवऱ्याच्या बरोबरीने पैसे मिळाले तरी ती शेवटीच जेवते. आपलं अस्तित्व विसरून नवं नाव घेऊन, नव्या घरात राहणं आणि आपलं अस्तित्व कळूही न देता सामावून जाणं, यात कर्तृत्व असतं.
शेवटी कर्ता पुरुष असंच समाज म्हणतो ना? मग आईच्या कर्तृत्वाचं हे असंच वेगळ्या मार्गांनी कौतुक करावं लागतं!

स्त्री आणि पुरुष यांना निसर्गाने काही देणग्या दिल्या आहेत, ज्या एकमेकांना पूरक असतात. त्यांचे वैयक्तिक फ़ायदे आंणि तोटे असतात. त्यांचा जमाखर्च मांडला तर कधीच पूर्ण व्हायचा नाही. नाती दुरावतील आणि मनात अढी तेवढी निर्माण होईल.

Wednesday, July 19, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

सर्वप्रथम, मला 'tag' केल्याबद्दल अमितचे मनापासून आभार.वाचनाची आवड खूप आहे. एखादे पुस्तक आवडले की त्याचा फ़डशा पाडेपर्यंत काही चैन पडत नाही. पुस्तकांशिवाय अभियांत्रिकीची ४ वर्षे आणि अमेरिकेतली ३ एकाकी वर्षे कशी सरली असती काय माहित! तशी प्रामुख्याने इंग्रजी पुस्तके वाचली गेली याचे एकमेव कारण म्हणजे उपलब्धता. मराठी पुस्तके भारतात असताना खूप वाचली गेली पण मराठी साहित्यावरचे ब्लॉग पाहिल्यावर मात्र न्यूनगंड निर्माण झाला.

नुकतीच १ महिन्यासाठी भारतात जाऊन आले तेंव्हा येताना बरीच पुस्तकं आणली, अर्थात बरोबर आईला न्यावे लागले कारण नवसाहित्यातले माझे ज्ञान अगाध आहे. तेव्हा चुकीच्या संदर्भांसाठी वाचकांची आगाऊ क्षमा मागून सुरुवात करते.

१. नुकतेच विकत घेतलेले पुस्तक:
ऐरणीवरचे प्रश्न: प्रतिभा रानडे

२. वाचले असल्यास पुस्तकाबद्दल थोडे:
समान नागरी कायदा (common civil code) हा प्रामुख्याने स्त्रियांशी निगडित विषय. आजपर्यंत त्याचे बरेच politicization केले गेले, शहाबानो खटला हे एक ज्वलंत उदाहरण. याव्यतिरिक्त या कायद्याबद्दलची राजकीय पक्षांची मते बदलत राहिली. हा प्रश्न आता बासनात पडून आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात अस्तित्वात असलेल्या समान नागरी कायद्याबद्दल बरीच उपयुक्त माहिती या पुस्तकातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्याच्या स्त्री-मुक्ती आंदोलनाकडे पाहिल्यावर, खऱ्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करणारा हा प्रयत्न कौतुकास्पद वाटला.

३. आवडलेली प्रभाव टाकणारी ५ पुस्तके:
व्यक्ती आणि वल्ली: पु.ल.
मंतरलेले दिवस: ग.दि.मा.
युगांत: इरावती कर्वे
आहे मनोहर तरी: सुनीता देशपांडे
स्वामी: रणजित देसाई
पूर्वरंग: पु.ल.
ओसाडवाडीचे देव: चि.वि.जोशी
आणखी भोकरवाडी: द. मा. मिरासदार
पटावरील प्यादे: खाडिलकर
अजबखाना: विं.दा. करंदीकर
या व्यतिरिक्त कित्येक पुस्तके आहेत ज्यांची नावे लिहिल्याशिवाय राहवत नाही, आणखी चिमणराव, हसवणूक, श्रीमान योगी, पावनखिंड, मी कसा झालो

४. वाचायचे आहेत अशी ५ पुस्तके:
कर्हेचे पाणी: आचार्य अत्रे
बनगरवाडी: व्यंकटेश माडगुळकर
महानायक: विश्वास पाटिल
बदलता भारत: भानू काळे
कोसला: भालचंद्र नेमाडे
सत्याचे प्रयोग: महात्मा गांधी
मी नथुराम गोडसे बोलतोय

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडे:
व्यक्ती आणि वल्ली बद्दल मी काय लिहावे. सखाराम गटणेचे "मी आपल्या साधनेत व्यत्यय तर नाही ना आणला", नारायण, परोपकारी गंपू, कितीदाही वाचले तरी मन भरत नाही. तरीही नंदा प्रधान हा सर्वात जास्त आवडलेला.

इथे औंधाचा राजाबद्दल लिहिल्याशिवाय राहवत नाही. इतके अप्रतिम लिखाण परत कधीच वाचायला मिळाले नाही.


मी tag करते,

अश्विनी देशमुख,
http://ashwinivdeshmukh.blogspot.com/

चक्रपाणि
http://khoopkaahee.blogspot.com/ यांना.

Wednesday, July 05, 2006

प्रत्येक माणसाची एक ओळख असते. माझीही आहे. पण ओळख म्हणजे शेवटी असते काय? माझे नाव? माझी मातृभाषा? माझा देश, धर्म, जात? माझे शिक्षण? माझी वेषभूषा? माझी विचारसरणी? माझं समाजातलं स्थान? एखादे सर्वसमावेशक उत्तर अधिक योग्य वाटेल असे वाटते आणि ते शोधण्याचा हा एक प्रयत्न.

या मंचावर आपल्याला अनेक गोष्टी वाचायला मिळतील, पहायला मिळतील. आवडती पुस्तके, चित्रपट, संगीत, व्यक्तिमत्त्वे, राजकीय, सामाजिक घडामोडी यांचा हा पसारा. पसारा कितीही अव्यवस्थित दिसला तरी त्यातली लहानशी टाचणीही तितकीच महत्त्वाची असते, नाही का?. तो आवरताना ती टाचणी हाताला बोचेलही कदाचित, त्या तयारीनेच तर हा संकल्प सोडला आहे.

वाचक आपल्या बहुमूल्य प्रतिक्रियांनी हा प्रवास सुसह्य करतील अशी आशा बाळगते आणि प्रवासाला सुरुवात करते.