माझ्या मनाचा शोध

Wednesday, July 19, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

सर्वप्रथम, मला 'tag' केल्याबद्दल अमितचे मनापासून आभार.वाचनाची आवड खूप आहे. एखादे पुस्तक आवडले की त्याचा फ़डशा पाडेपर्यंत काही चैन पडत नाही. पुस्तकांशिवाय अभियांत्रिकीची ४ वर्षे आणि अमेरिकेतली ३ एकाकी वर्षे कशी सरली असती काय माहित! तशी प्रामुख्याने इंग्रजी पुस्तके वाचली गेली याचे एकमेव कारण म्हणजे उपलब्धता. मराठी पुस्तके भारतात असताना खूप वाचली गेली पण मराठी साहित्यावरचे ब्लॉग पाहिल्यावर मात्र न्यूनगंड निर्माण झाला.

नुकतीच १ महिन्यासाठी भारतात जाऊन आले तेंव्हा येताना बरीच पुस्तकं आणली, अर्थात बरोबर आईला न्यावे लागले कारण नवसाहित्यातले माझे ज्ञान अगाध आहे. तेव्हा चुकीच्या संदर्भांसाठी वाचकांची आगाऊ क्षमा मागून सुरुवात करते.

१. नुकतेच विकत घेतलेले पुस्तक:
ऐरणीवरचे प्रश्न: प्रतिभा रानडे

२. वाचले असल्यास पुस्तकाबद्दल थोडे:
समान नागरी कायदा (common civil code) हा प्रामुख्याने स्त्रियांशी निगडित विषय. आजपर्यंत त्याचे बरेच politicization केले गेले, शहाबानो खटला हे एक ज्वलंत उदाहरण. याव्यतिरिक्त या कायद्याबद्दलची राजकीय पक्षांची मते बदलत राहिली. हा प्रश्न आता बासनात पडून आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात अस्तित्वात असलेल्या समान नागरी कायद्याबद्दल बरीच उपयुक्त माहिती या पुस्तकातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्याच्या स्त्री-मुक्ती आंदोलनाकडे पाहिल्यावर, खऱ्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करणारा हा प्रयत्न कौतुकास्पद वाटला.

३. आवडलेली प्रभाव टाकणारी ५ पुस्तके:
व्यक्ती आणि वल्ली: पु.ल.
मंतरलेले दिवस: ग.दि.मा.
युगांत: इरावती कर्वे
आहे मनोहर तरी: सुनीता देशपांडे
स्वामी: रणजित देसाई
पूर्वरंग: पु.ल.
ओसाडवाडीचे देव: चि.वि.जोशी
आणखी भोकरवाडी: द. मा. मिरासदार
पटावरील प्यादे: खाडिलकर
अजबखाना: विं.दा. करंदीकर
या व्यतिरिक्त कित्येक पुस्तके आहेत ज्यांची नावे लिहिल्याशिवाय राहवत नाही, आणखी चिमणराव, हसवणूक, श्रीमान योगी, पावनखिंड, मी कसा झालो

४. वाचायचे आहेत अशी ५ पुस्तके:
कर्हेचे पाणी: आचार्य अत्रे
बनगरवाडी: व्यंकटेश माडगुळकर
महानायक: विश्वास पाटिल
बदलता भारत: भानू काळे
कोसला: भालचंद्र नेमाडे
सत्याचे प्रयोग: महात्मा गांधी
मी नथुराम गोडसे बोलतोय

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडे:
व्यक्ती आणि वल्ली बद्दल मी काय लिहावे. सखाराम गटणेचे "मी आपल्या साधनेत व्यत्यय तर नाही ना आणला", नारायण, परोपकारी गंपू, कितीदाही वाचले तरी मन भरत नाही. तरीही नंदा प्रधान हा सर्वात जास्त आवडलेला.

इथे औंधाचा राजाबद्दल लिहिल्याशिवाय राहवत नाही. इतके अप्रतिम लिखाण परत कधीच वाचायला मिळाले नाही.


मी tag करते,

अश्विनी देशमुख,
http://ashwinivdeshmukh.blogspot.com/

चक्रपाणि
http://khoopkaahee.blogspot.com/ यांना.

Wednesday, July 05, 2006

प्रत्येक माणसाची एक ओळख असते. माझीही आहे. पण ओळख म्हणजे शेवटी असते काय? माझे नाव? माझी मातृभाषा? माझा देश, धर्म, जात? माझे शिक्षण? माझी वेषभूषा? माझी विचारसरणी? माझं समाजातलं स्थान? एखादे सर्वसमावेशक उत्तर अधिक योग्य वाटेल असे वाटते आणि ते शोधण्याचा हा एक प्रयत्न.

या मंचावर आपल्याला अनेक गोष्टी वाचायला मिळतील, पहायला मिळतील. आवडती पुस्तके, चित्रपट, संगीत, व्यक्तिमत्त्वे, राजकीय, सामाजिक घडामोडी यांचा हा पसारा. पसारा कितीही अव्यवस्थित दिसला तरी त्यातली लहानशी टाचणीही तितकीच महत्त्वाची असते, नाही का?. तो आवरताना ती टाचणी हाताला बोचेलही कदाचित, त्या तयारीनेच तर हा संकल्प सोडला आहे.

वाचक आपल्या बहुमूल्य प्रतिक्रियांनी हा प्रवास सुसह्य करतील अशी आशा बाळगते आणि प्रवासाला सुरुवात करते.